रविवारपासून बीडला राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे स्व.झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानचे आवाहन
बीड | प्रतिनिधी ✍️
बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाला उद्या रविवार दि.३१ डिसेंबर रोजी प्रारंभ होणार आहे. बीडकर भाविक-भक्तांनी या महोत्सवाला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
खटोड प्रतिष्ठानच्यावतीने मागील २० वर्षापासून मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत अध्यात्मिक विचारांनी करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला जातो. आज पर्यंत महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील कीर्तनकारांनी आपली सेवा देत कीर्तनाच्या माध्यमातून सर्व संतांचे विचार बीडकरांपर्यंत पोहचवले आहेत.
गेल्या 20 वर्षापासून स्व.झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान नि:स्वार्थपणे संत वचन जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करत आहे. या वर्षी सुध्दा ३१ डिसेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ या कालावधीत सांप्रदायिक कीर्तने, कथा, भारुड अशा विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आली. शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा महोत्सव संपन्न होणार आहेत. दि.३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता साध्वी अनुराधा दिदी यांच्या समुधरवाणीतून भगवान पांडुरंग रुक्मिणी यांच्या विवाह सोहळ्याने संगीतमय कथसे सुरुवात होणार आहे. ही कथा दि.५ जानेवारी पर्यंत होणारा असून रोज सांप्रदायिक कीर्तने, भारुड, संत चरित्रकथा असे भरगच्च कार्यक्रम सकाळी १० ते सायं. १० पर्यंत हा चालणार आहेत.
या महोत्सवाने बीडचे नाव राज्यभरात पोहचले. कीर्तनकारांबरोबरच देशपातळीवर कार्य करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर, मंडळी यांनी या महोत्सवात उपस्थिती दर्शवून त्यांचे विचार व्यक्त करत अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधन केले. खटोड प्रतिष्ठानने महोत्सवाच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ निर्माण केली. त्याबरोबरच मुलींचा सामुदायिक नामकरण सोहळा, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कॉपीमुक्तीची चळवळ या सारखे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमही प्रतिष्ठानने मागील २० वर्षात राबवले. यातील अनेक उपक्रमांची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डने घेतली हे विशेष. बीडकर भाविकांनी सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून अध्यात्मिक विचार अंगीकारावेत असे आवाहन स्व.झुंबरलाल खरोड सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
सर्वांना मोफत प्रवेश तरुणांमध्ये अध्यात्मिक विचारांची रुजवणूक व्हावी आणि भारतीय संस्कृतीची मूल्य आणि परंपरा पुढेही अविरत सुरु रहाव्यात या उदात्त हेतूने विचारांचे गांभीर्य करण्याबरोबरच अध्यात्मिक विचारांची रुजवणूक करण्यासाठी हा महोत्सव संपन्न होत असून यंदा ३१ डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सर्व बीडकर भाविक-भक्तांना प्रवेश मोफत असून कोणत्याही पासची गरज नाही. आपल्या आप्तेष्ठांसह या भरगच्च कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.