गोटेगाव येथील ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी अद्यापही मोकाट
ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी व त्याच्या साथीदाराकडून फिर्यादीला व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी — सतेश बचुटे
केज : तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोटेगाव येथील एका ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी व त्यांच्या साथीदाराकडून फिर्यादीला व त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे संबंधित आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे सतेश बचुटे यांनी केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सतेश नवनाथ बचुटे रा.गोटेगाव (ता. केज जि.बीड) ह.मु. भिवंडी जि.ठाणे येथील रहिवासी आहेत.दि. ३१ मे २०२४ रोजी युसुफ वडगाव पोलीस ठाणे येथे आरोपी प्रताप अण्णा बोराडे व मनीषा प्रताप बोराडे यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला असताना व प्रताप बोराडे यांनी माझ्या पत्नीला मारहाण केलेली असताना देखील आजपर्यंत संबंधित आरोपींना पोलिसांनी मोकाट सोडलेले आहे. उलट संबंधित आरोपी व त्यांचा मुलगा,त्याचा भाऊ व भावाचा मुलगा हे सर्व जण माझ्या जागेत येऊन मला व माझ्या पत्नीला सतत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. दि ७ जून २०२४ रोजी सायंकाळी ७-४५ वाजण्याच्या दरम्यान सदरीलआरोपीचा भाऊ बजरंग अण्णा बोराडे व त्याचा मुलगा मयूर बजरंग बोराडे यांच्यासह दोन अनोळखी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती हे माझ्या जागेत येऊन मला खूप शिवीगाळ केली व तू येथे कसा राहतोस तुला आम्ही जिवंत सोडणार नाहीत तू येथून तात्काळ निघून जा असे म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. आम्ही युसूफ वडगाव पोलीस स्टेशनला संबंधित तक्रार देण्यासाठी गेलो असता त्या व्यक्तीने पोलीस स्टेशनला हजर असताना संबंधित पोलीस स्टेशनने त्या व्यक्तीवर कसलीच कारवाई केली नाही. मी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कडे फोन केला असता येथील कर्मचारी चोपणे यांनी मला सांगितले की, आरोपींना नोटीस देऊन बोलवले आहे असे म्हणून उडवीची उत्तरे दिलेआहेत.
माझ्या पत्नीला पुरुषांनी मारहाण करून व मला जातीवाचक शिवीगाळ करून देखील संबंधित कर्मचारी हे फक्त नोटीस देण्याची भाषा करत आहेत व हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत असे सतेश नवनाथ बचुटे यांनी लेखी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच सतेश बचुटे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, संबंधित आरोपीं ना तात्काळ अटक करण्यात यावी हे आरोपी मोकाट फिरत आहेत त्यामुळे संबंधित आरोपी पासून मला व माझ्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी लेखी निवेदनाद्वारे सतेश बचुटे यांनी पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे मागणी केली आहे. सदर निवेदनावर सतेश बचुटे यांची स्वाक्षरी आहे.