सामाजिक न्यायाचे शासन, प्रशासनातले दूत :- सचिव, श्री सुमंत भांगे


मंत्रालयात कामानिमित्त गेल्यानंतर एखाद्या मंत्र्यांच्या कॅबिन बाहेर जनतेचा दिसणारा गराडा ही नित्याचीच बाब आहे. मात्र हाच गराडा जर एखाद्या विभागाच्या सचिवांच्या केबिन बाहेर दिसत असेल तर निश्चितच अशा सचिवांचे केबिन हे जनतेसाठी आधार केंद्र तर नाही ना असा प्रश्न निर्माण होतो. सध्या असाच अनुभव मंत्रालयात पहिल्या मजल्यावर सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या कॅबिन अनुभवायला येतो. त्याचं कारण ही तसंच आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे यांचा जनतेप्रती असलेला जीव्हाळा व त्यांच्या कामाची पद्धत. राज्यात मराठा आरक्षण संदर्भात वादळ शांत करण्यामध्ये सचिव सुमंत भांगे यांची भूमिका निश्चितच अत्यंत महत्त्वाची ठरले आहे. अशी महत्त्वपूर्ण कामगिरी करणारे सचिव श्री सुमंत भांगे यांचा आज दि 22 जुलै 2024 जन्मदिवस असून येणाऱ्या 31 जुलै 2024 रोजी त्यांच्या वयाची 60 पूर्ण होत असल्याने प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. त्याबद्दल श्री भांगे सर यांच्या कार्याचा घेतलेला आढावा……

—————————————————
मराठवाडा सारख्या विकासाच्या अनुशेष शिल्लक राहिलेल्या सारणी (सांगवी) तालुका केज जिल्हा बीड या भागातून 80 च्या दशकात श्री सुमंत भांगे यांच्यासारखा तरुण प्रशासकीय सेवेत प्रवेश करतो. कुटुंबात आई-वडील, तीन बहिणी असा परिवार. वडील शिक्षक असल्याने व आईचे शिक्षणाप्रती असलेले पाठबळ, शिक्षणाचे संस्कार व विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचे/कुटुंबाचे असलेले प्रश्न गाठीशी घेऊन आपल्या यशाचा टप्पा गाठतो व अशा समाजाच्या परिवर्तनासाठी प्रशासकीय सेवेची जोड देऊन न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थाने श्री सुमंत भांगे यांनी पार पाडली आहे. सन 1987 मध्ये श्री भांगे साहेब यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीला प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी औरंगाबाद येथून सुरुवात केली. दुष्काळग्रस्त मराठवाडा भागाची जाणीव असल्याने साहेबांनी जाणीवपूर्वक मराठवाडा विभागात आपल्या प्रशासकीय कामगिरी कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी परभणी, अप्पर जिल्हाधिकारी औरंगाबाद, मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन बोर्ड, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा, औरंगाबाद ,मुख्य कार्यकारी अधिकारी सिडको,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली , जिल्हाधिकारी रायगड, मुख्य कार्यकारी अधिकारी पुनर्वसन नवनिर्माण बोर्ड म्हाडा , व्यवस्थापकीय संचालक ,महाराष्ट्र राज्य मत्स्य विभाग, सचिव, सामाजिक न्याय विभाग, सचिव, सामान्य प्रशासन विभाग, सचिव, दिव्यांग विभाग, सचिव, अन्न नागरी पुरवठा विभाग अशा अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीच्या पदावर साहेबांनी आपल्या 37 वर्षाच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेच्या काळात योगदान दिले आहे.
सद्यस्थितीत श्री भांगे साहेब यांच्याकडे सचिव सामाजिक न्याय विभाग, सचिव ,दिव्यांग विभाग व सचिव सामान्य प्रशासन विभाग यात या तीन विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मंत्रालय स्तरावर एखाद्या अधिकाऱ्याला तीन चार विभागाची जबाबदारी मिळाल्याची तसे दुर्गम उदाहरण आहे मात्र आपल्या कार्यकर्तृत्वामुळे व आपल्या कामकाजाच्या पद्धतीमुळे सर्वसामान्य जनतेला हवेसे असणारे व्यक्तिमत्व श्री भांगे साहेब यांच्या असून राज्याच्या नेतृत्वाने देखील त्यांचे हेच गुण हेरून त्यांना अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
राज्यात गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा विषय गाजत असताना या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न श्री भांगे साहेब यांनी केलेला असून त्यांचे आरक्षण प्रश्न असलेले कार्य व भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी न्यायमूर्ती शिंदे समिती, सेवानिवृत्त मा. न्यायाधीशांचे सल्लागार समिती, राज्य मागासवर्ग आयोग, आणि शासन यामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून साहेबांनी आपली भूमिका चोखपणे निभावली आहे. आरक्षण संदर्भात शासनाकडून प्रसिद्ध झालेले महत्त्वाचे शासन निर्णय, अध्यादेश,विविध परिपत्रके हे श्री सुमंत भांगे यांच्या स्वाक्षरीनेच निर्गमित झाले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी अनेक रात्रीचे दिवस एक करून त्यांनी केलेलं कार्य निश्चितच भूषवाह आहे. सचिव सुमंत भांगे सर यांच्याकडे शासनाने सोपवलेला विषय अत्यंत अभ्यासपूर्ण निर्णय घेऊन मार्गी लावले आहेत.
सामाजिक न्याय विभागाचे मंत्री म्हणून सध्या मुख्यमंत्र्यांकडेच विभाग असल्याने सर्वसामान्य लाभार्थी किंवा जनतेला मुख्यमंत्र्यांना भेटता येईलच असे नाही, मात्र सचिव श्री भांगे यांनी सर्वसामान्य जनतेला त्याची कधीच उणीव भासू दिली नाही. आलेल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे समाधान होईल या पद्धतीने त्यांनी वागणूक देऊन त्याच्या प्रश्नांची सोडवणूक केली आहे विभागाला स्वतंत्र मंत्री नसूनही तशी कधी उणीव त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे जाणवली नाही. एका वेळी चार चार विभागाचे सचिव पदाची सूत्रे सांभाळणे ही सामान्य व सोपी गोष्ट नाही. मात्र त्यांनी त्यांच्या पदाला पूर्णपणे न्याय देण्याचा सदैव प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सामाजिक न्याय सारख्या महत्त्वाच्या विभागात सचिव पदाची सूत्रे हाती स्वीकारल्यानंतर विभागात अनेक महत्त्वपूर्ण बदल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत. सर्व समाजातील सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक समान धोरण आखण्यामध्ये देखील साहेबांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांच्या देखील कल्याणासाठी दिव्यांग विभागाच्या माध्यमातून साहेबांनी सदैव प्रयत्न चालवला आहे व विभागाला नवीन स्वरूप प्राप्त करून दिले आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाचा देखील अतिरिक्त कार्यभार साहेबांकडे सोपवण्यात आला होता अत्यंत कमी कालावधीत देखील त्यांनी त्या विभागात जनतेपर्यंत रेशन पोहोचण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सचिव श्री सुमंत भांगे यांनी आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी पदे भूषवली जनता साहेबांशी जोडली गेली आहे व आजही त्यांचे साहेबांबरोबर असलेले ऋणानुबंधन निश्चितच वाखण्याजोगे आहे. व आजही मंत्रालयात श्री भांगे साहेब यांच्याकडे आलेल्या नागरिकाचे जाताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेले समाधान हेच खरे सचिव भांगे साहेब यांच्या ऊर्जेचे स्रोत आहे असे म्हणावे लागेल. गेल्या दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीत भांगे साहेबांची अनुसूचित जातीच्या समाजासाठीची तळमळ आणि प्रामाणिक न्यायची भूमिका हे महत्त्वाचे कारण होते. समाजाच्या शेवटच्या घटकातील अनुसूचित जाती, मागास समाज, दिव्यांग जन यांच्या जीवनात प्रगतीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी भांगे साहेबानी मनापासून काम केले. शासकीय चौकटीच्या बाहेर जाऊन कार्यालय सोडताना शेवटच्या अभ्यागताचे काम होत नाही तोपर्यंत कार्यालय सोडायचे नाही हा त्यांचा दिनक्रम ठरलेला.
आपल्या विभागाचे काम इतर विभागात असेल तर वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करणे हे त्यांचे नित्याचेच काम.
आपल्या विभागातील कर्मच्याऱ्यांना सहकाऱ्याच्या भूमिकेतून वागणूक देताना सामाजिक भावनेची जाणीव देखील त्यानी करुन दिली.त्यामुळे विभागात देखील कार्यसंस्कृती बदलली.
आपल्या यशाचे आणि सदैव हसतमुख असण्याचे गमक त्याना विचारले तर त्यांच्या विशिष्ट शैलीत Joy of giving हे त्याचे गमक ते सहजतेने सांगून टाकतात.सहकाऱ्यांवर ते ज्या विश्वासाने कामे सोपवतात ते त्यांच्या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आपल्या सहकार्यावर विश्वास टाकताना त्याला आवश्यक असणारे संसाधने त्यांना त्वरित उपलब्ध करून देणे हा त्याच्या कामाचा नित्याचा भाग. त्यामुळे विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना श्री भांगे साहेब आपलेसे वाटतात.
एकंदरीत शासन प्रशासनात अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, जो तो अधिकारी त्यांच्या परीने आपल्या पदास न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात , त्यात श्री भांगे साहेब हे सरसच ठरले आहेत हे मात्र या निमित्ताने निश्चित सांगता येते. त्यामुळेच सामाजिक न्यायाचे शासन प्रशासनाचे दूत श्री भांगे साहेब ठरले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.!
————————————————–
लेखक – शशिकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी, समाज कल्याण विभाग नाशिक.
——————————————————


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!