व्यसनमुक्त गाव मोहिमेस शिऊर येथून प्रारंभ
• पोलिस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांचा लोकसहभागातून व्यसनमुक्तीचा निर्धार
नांदेड : परिक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या व्यसनमुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ दि.२ ऑक्टोबर रोजी नांदेड मधील हदगाव तालुक्यातील शिऊर येथून करण्यात आला.
यावेळी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार, जिल्हा कृषी अधिकारी श्री भाऊसाहेब बऱ्हाटे यांचेसह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व मुलांची लक्षणीय उपस्थिती होती.
दि. २ ऑक्टोबर रोजी नांदेड परिक्षेत्रात असणाऱ्या चारही जिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्यात येऊन, तंटामुक्त गांव समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, गावोगावी ग्रामरक्षक दल व दुर्गा व्यसनमुक्त गाव समित्या देखील तयार करण्यात येत आहेत.
अवैध मार्गाने गाव पातळीवर पोहोचणाऱ्या व्यसनांच्या साधनांचा पोलीस बंदोबस्त करत असतानाच, व्यसनांची अशी साधने गाव पातळीवर पोहोचू नयेत या दृष्टिकोनातून, प्रत्येक गावात तंटामुक्त गाव समिती, दुर्गा व्यसनमुक्त गाव समिती व ग्राम रक्षक दल तयार करण्यात येत आहेत.
व्यसनाधिनतेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची, विशेषत: तरुणांची झालेली ससेहोलपट लक्षात घेऊन, त्यांना या विळख्यातून बाहेर काढण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नांदेड परिक्षेत्रात सदराची योजना राबविण्यात येत आहे.
अवैध व्यवसायांच्या उच्चाटनासाठी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार अहोरात्र प्रयत्न करत असून गांव पातळीवर तयार झालेल्या उपरोक्त समित्या दारू, गुटखा इत्यादी व्यसनांची साधने गावात पोहोचू न देण्यासाठी पोलिसांना मोलाची मदत करतील, असा आशावाद पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी व्यक्त केला आहे.
याप्रसंगी, पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार यांनी देखील आपले विचार व्यक्त करताना, सदर मोहिमेस नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहन केले.